चेन्नई - देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणण्यात हात असल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन ही तुरुंगाबाहेर आली आहे. नलिनीला मद्रास उच्च न्यायालयाने 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी नलिनीला कारावासातून बाहेर सोडण्यात आले. मुलीच्या विवाहाची पूर्वतयारी करण्यासाठी नलिनीने मद्रास हायकोर्टाकडे सहा महिन्यांच्या पॅरोलची मागणी केली होती. अखेरीस तिला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. राजीव गांधी हे 1991 च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी तामिळनाडू येथील श्रीपेराम्बदूर येथे आले असताना लिट्टेच्या दहशतवाद्यांनी मानवी बॉम्बच्या मदतीने स्फोट घडवून त्यांची हत्या घडवून आणली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी असलेल्या पेरारीवलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस यांना अटक करण्यात आली होती. पुढे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी हिने मुलीच्या विवाहासाठी सहा महिन्यांच्या पॅरोलची मागणी केली होती. पण कोर्टाने नलिनी हिला केवळ 30 दिवसांचा पॅरोल मंजुर केला आहे. प्रत्येक व्यक्तीला दोन वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर एक महिन्याची सामान्य सुट्टी मिळते. मात्र मी गेल्या 27 वर्षांपासून एकदाही सुट्टी घेतलेली नाही. त्यामुळे मला पॅरोल देण्यात यावा, अशी मागणी नलिनी हिने केली होती. काही दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकारने राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 7 दोषींची सुटका करण्यात येईल, असे आश्वासन मद्रास उच्च न्यायालयाला दिले होते. दरम्यान, घटनेतील कलम 161 अंतर्गत सातही दोषींना मुक्त करण्यात यावे अशी मागणी डीएमकेचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी केले होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी महिला तुरुंगाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:38 PM