लखनऊ - उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे एका महिलेची हॉस्पिटलच्या गेटवरच प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलेकडे आधार कार्ड आणि बँक खातं नसल्या कारणानेच तिला भर्ती करुन घेण्यास रुग्णालयाने नकार दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय निष्काळजीपणाची ही घटना जौनपूर येथील शाहजंग आरोग्य केंद्रातील आहे. रुग्णालय प्रशासनच्या बेजबाबदार वागण्यामुळे महिलेला लाचारपणे हॉस्पिटलच्या गेटवरच प्रसूती करावी लागली. नवजात बाळ जवळपास एक तास तसंच जमिनीवर पडून होतं.
महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा कर्मचा-यांनी काही कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्र नसल्या कारणाने त्यांनी भर्ती करुन घेण्यास नकार दिला. आम्ही रुग्णालयातून बाहेर पडलो तेव्हा प्रसूतीवेदना सुरु होत्या. अखेर माझ्या पत्नीने रुग्णालयाच्या गेटवरच बाळाला जन्म दिला'.
रुग्णालया प्रशासनाच्या बेजबाबदार वागण्याचा लोकांकडून निषेध केला जात आहे. महिलेची प्रसूती झाली त्यावेळी तेथूनच जात असणा-या एका व्यक्तीने सांगितलं की, 'प्रसूतीवेदनांशी झगडणारी महिला आणि हॉस्पिटलच्या गेटवर होणारी प्रसूती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याचा दावा फोल ठरवत आहे. ही घटना सरकारचे मोठमोठे दावे फोल ठरवतंय'.
दुसरीकडे वैद्यकीय अधिक्षकांनी दावा केला आहे, 'डॉक्टरांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात रेफर केलं होतं. रेफर केलं त्यावेळी महिलेने आपला एक नातेवाईक तिथे घेऊन जाईल असं सांगितलं. पण गेटवर पोहोचतात प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिला तात्काळ रुग्णालयात आणण्यात आलं, ज्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. दोघेही आता सुरक्षित आहेत'.