गेल्या वर्षी एका बापाने आपल्या मुलाला छातीला कवटाळलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तो मुलगा कुत्र्यासारखे भुंकत होता. त्या मुलाचा तसाच तडफडून मृत्यू झाला. त्याला कुत्र्याने चावले होते, परंतू घरच्यांना उशिरा समजले होते. असाच एक हृदयद्रावक प्रकार ग्रेटर नोएडामध्ये घडला आहे. एका महिलेचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. गाईच्या दुधातून तिला हे संक्रमण झाल्याचे सांगितले जात आहे.
एका मोकाट कुत्र्याने गाईला चावले होते. यामुळे गाईला रेबीज झाला होता. यामुळे या गाईचे दूध पिणाऱ्या लोकांनी रेबीजची लस घेतली होती. परंतू या महिलेने काही उपचार घेतले नव्हते. यामुळे तिच्यामध्ये काही दिवसांनी लक्षणे दिसू लागली होती, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
या महिलेला त्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे तिला भरती करून घेतले गेले नाही. शेवटी तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतू, डॉक्टरांनी परिस्थिती पाहून तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. काही काळाने तिचा मृत्यू झाला. यामुळे या गाईचे दूध पिणारे आता चिंताग्रस्त झाले आहेत.
गाय, म्हैस संक्रमित असेल तर...
रेबीज झालेल्या गाईचे किंवा म्हैशीचे दूध पिल्यास रेबीजची लागण होऊ शकते. परंतू, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते दूध उकळल्याशिवाय सेवन केले तर. आयसीएआरच्या अहवालानुसार दूध न उकळता पिणाऱ्या व्यक्तीला श्रेणी १ धोक्यामध्ये ठेवण्यात आले आहे.
किती घातक आहे रेबीज...रेबीज हा एक जीवघेणा संसर्ग आहे. हा विषाणू मज्जासंस्थेवर आगात करतो. लक्षणे दिसण्यासाठी काही आठवडे किंवा महिने लागू शकतात. ताप, डोकेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे सुरुवातीला असतात. परंतू, नंतर ती व्यक्ती कुत्र्यासारखी वागू लागते. भुंकल्यासारखी ओरडू लागते. रेबीजचा विषाणू मेंदूपर्यंत पोहोचला की मग ती व्यक्ती वाचणे अशक्य असते. काही दिवसांतच या व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. यामुळे लहान मुलांना कुत्र्यापासून दूर राहण्यास सांगणे, जर चावा घेतलाच तर घाबरून लपवून न ठेवणे, घरच्यांना याबाबत सांगण्याचे समजवावे.