नवी दिल्ली-
एका महिलेनं OLA ऑटो बुक केली आणि काही वेळानं ऑटो पोहोचली. पण ऑटो चालक एक महिला होती आणि ज्या महिलेनं ऑटो बुक केली होती तिनं कुतुहलानं चालक महिलेशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रवासी महिलेला जी कहाणी समजली ती सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या महिला ऑटो चालकाची कहाणी तिनं तिच्या लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर केली आणि प्रवासी महिलेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे.
नंदिनी चोलाराजू यांनी आपल्या लिंक्डइन अकाऊंटवर ऑटो चालक छाया हिची कहाणी कथन केली आहे. नंदिनी या OLLIT EXPEDITIONS च्या संस्थापक आणि संचालक आहेत. नंदिनी यांनी छायासोबत तिच्या ऑटोरिक्षा चालवण्याचा अनुभवाबद्दल विचारणा केली. छायाची कहाणी नंदिनी यांनी पोस्ट केली आणि या पोस्टला ३६ हजाराहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तर शेकडो युझर्सनं पोस्ट शेअर केली आहे.
सध्या ऑटो ड्रायव्हर असलेली छाया ऑटो रिक्षा चालवण्याआधी एका फॅक्ट्रीमध्ये रितसर नोकरी करत होती. पण तिथलं वातावरण बरोबर नव्हतं. त्यामुळे तिनं नोकरी सोडली. ते काम सोडून छायानं एक फूडस्टॉल सुरु केला. यात तिला काही महिने यश मिळालंही, पण कालांतरानं खूप नुकसान होऊ लागलं. छायाचा भाऊ ऑटो ड्रायव्हर होता. तेव्हा तिच्या भावानं तिला ऑटो चालक होण्याचा सल्ला दिला. इलेक्ट्रिक ऑटो पाहून ती उत्सुक झाली. पण तिच्या पतीची भूमिका वेगळी होती. त्यामुळे तिला सुरुवातीला आपल्या पतीच्या इच्छेविरोधात ऑटो चालवण्याचं काम करायचं नव्हतं. मग एकेदिवशी तिनं पतीला काही दिवस प्रयत्न करण्याची विनंती केली आणि पतीनं होकार दिला.
छायानं सांगितलं की ती जवळपास दररोज १०० किमी ऑटो चालवते. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ती ऑटो चालवते आणि त्यानंतर घरातील कामांकडे लक्ष देते.
किती होते कमाई?"मी पहिल्यांदा ऑटो चालवायला सुरुवात केली आणि त्यानंतर आजवर मी थांबलेच नाही. मी दिवसाला ८०० ते १ हजार रुपये कमावण्यास सुरुवात केली. दरमहिन्याची २५ हजार रुपयांची कमाई सहज होते. मला माझ्या पती आणि मुलांचा अभिमान आहे. मलाही खूप आनंद आहे की मी माझ्या कुटुंबाला हातभार लावू शकत आहे.
छायाची कहाणी ऐकून खूप गर्व वाटत असल्याचं नंदिनी यांनीही म्हटलं आहे. छायाचं एक वाक्य नंदिनी यांना खूप भावलं ते म्हणजे... आयुष्य नेहमी सुकर नसतं, त्यामुळेच मी आव्हान स्वीकारलं!