नवी दिल्ली - चेन्नईतील एका महिलेनं एटीएमच्या बाजूला असलेल्या कचरापेटीत तब्बल 15 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेण्यात आला. तेव्हा ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेला झोपेत चालण्याची सवय असल्याची माहिती तपासातून समोर आली. एटीएमच्या सुरक्षा रक्षकाने कचरापेटीत लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडल्याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएमच्या सुरक्षा रक्षकाला कचरापेटीत एका चामड्याची बॅग सापडली. ती बॅग उघडताच त्याला धक्काच बसला. बॅगमध्ये सोन्याचे दागिने होते. यानंतर सुरक्षा रक्षकाने एटीएमच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात एक महिला कचरापेटीत बॅग फेकताना दिसली. बॅग फेकल्यावर ती एटीएमच्या बाहेर निघून गेली.
याच दरम्यान पोलिसांकडे एका दाम्पत्याने त्यांची 35 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पहाटे चारपासून मुलगी बेपत्ता असल्याचं दाम्पत्याने पोलिसांना सांगितलं. दाम्पत्याची मुलगी सकाळी सात वाजता घरी परतली. यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला कचरापेटीत बॅग फेकणाऱ्या महिलेचं फुटेज दाखवलं. फुटेजमधील महिला आपलीच मुलगी असल्याचं दाम्पत्यानं सांगितलं.
बॅगमध्ये तब्बल 15 लाखांचे दागिने होते, अशीही माहिती दाम्पत्याने दिली. मुलगी काही दिवसांपासून तणावाखाली असून तिला झोपेत चालण्याची सवय असल्याची माहिती दाम्पत्याने दिली. यानंतर पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग दाम्पत्याच्या हाती सोपवली. याबद्दल दाम्पत्यानं एटीएमचा व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकाचे आभार मानले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.