नवी दिल्ली - दिल्लीच्या विशेष न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून एका व्यक्तीची सुटका केली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्वाची किंवा लक्षवेधक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीच्या आईला आपल्या मुलीच्या हॅण्डबॅगमध्ये तीन वापरण्यात आलेले कंडोम सापडले होते. ज्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला होता. पण न्यायालयात सुनावणीदरम्यान, तरुणीने त्याच्यासोबत सहमतीने शरिरसंबंध ठेवल्याचं समोर आलं. यानंतर न्यायालयाने आरोप करण्यात आलेल्या तरुणाची निर्दोष सुटका केली.
शरिरसंबंधानंतर तरुणीने संधी मिळाल्यावर योग्य ठिकाणी फेकून देण्यात येईल या उद्देशाने कंडोम आपल्या बॅगेत ठेवले होते असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, आरोपीने लग्न करण्याचं खोटं आश्वासन देत 20 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात आलं होतं. पण सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या लक्षात आलं की, आई-वडिलांना आपल्या शारिरीक संबंधांची माहिती मिळाल्याने घाबरलेल्या तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये लग्नाचं आश्वासन दिला गेल्याचा काही संबंध नसल्याचंही समोर आलं.
हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, तरुणीने एका हॉटेलमध्ये तरुणासोबत शारिरीक संबंध ठेवले. जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा तिच्या बॅगेत तीन कंडोम असल्याचं तिच्या आईला आढळलं. यानंतर तरुणीने संपुर्ण कहाणी आपल्या आईला सांगितली. तिच्या आईने तात्काळ 100 नंबरला फोन करुन तक्रार केली.
न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं की, 'जर तरुणीच्या आईला बॅगेत कंडोम सापडलेच नसते तर कदाचित गुन्हा दाखल झालाच नसता. महिलेने आपण आरोपीच्या आई-वडिलांना याआधी भेटलो असून त्यावेळी लग्नाची कोणतीही बोलणी झाली नसल्याचं कबूल केलं आहे. तरुणीनेही आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही माहित नसल्याचं सांगितलं आहे. आपल्यात लग्नाची कोणतीही बोलणी झाली नसल्याची कबूली तरुणीने देणे, पोलीस तक्रारीमधील दावा फेटाळून लावत आहे'.