मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील एक महिला रातोरात लखपती बनली आहे. आदिवासी महिला गेंदाबाई जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेल्या होत्या. यातच जंगलात महिलेला बहुमूल्य ४ कॅरेट ३९ सेंटचा हिरा सापडला. महिलेनं तो हिरा कार्यालयात जमा केला. या हिऱ्याची किंमत जवळपास २० लाख रुपये इतकी सांगितली जात आहे. हिऱ्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
गेंदा बाई पन्ना नगरच्या पुरुषोत्तमपूरमधील वॉर्ड क्रमांक २७ मधील रहिवासी आहे. त्या दिनक्रमानुसार बुधवारी सकाळी जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेल्या होत्या. जंगलाच्या वाटेत महिलेला एक चमकणारा दगड दिसून आला. तो घेऊन महिलेनं आपल्या पतीला दाखवला. पती-पत्नीला हा नेमका काय प्रकार आहे कळेना म्हणून दोघांनीही हिरा कार्यालयात तो नेला. हिऱ्याची पारख करणाऱ्या अनुपम सिंह यांनी या चमकणाऱ्या दगडाची पारख केली आणि हा साधासुधा दगड नसून मौल्यवान हिरा असल्याची पुष्टी केली. याचं वजन ४ कॅरेट ३९ सेंट इतकी आहे. हिरा मिळाल्यानं आदिवासी कुटुंब खूप खूश झालं आहे.
गेंदाबाई म्हणाल्या की त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लाकूड विकून आणि मजुरी करुन त्यांच्या घराचा खर्च भागवावा लागतो. चार मुलं आणि दोन मुली लग्नाच्या आहेत. आता हिरा मिळाल्यामुळे त्यातून येणाऱ्या रकमेतून मुलींचं लग्न लावणार आणि एक घरही बांधणार असल्याचं त्या आनंदानं सांगतात.