नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात देशात मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये देखील घडली आहे. एका मेणबत्तीने होत्याचं नव्हतं झालं आहे. मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील टपूकडा ठाणे क्षेत्रात असलेल्या बुबकाहेडा या गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेणबत्तीमुळे लागलेल्या आगीत एका महिलेचा आणि तिच्या नातवाचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी लाईट गेल्यामुळे घरामध्ये उजेडासाठी मेणबत्ती पेटवण्यात आली होती. ही दुर्घटना घडली तेव्हा आजी आणि नातू झोपलेले होते. खोलीत ठेवलेल्या कापसाने पेट घेतल्याने ही आग लागली. तसेच इंधनाचे देखील काही कॅन हे खोलीत ठेवलेले होते. त्यामुळे आगीचा भडका उडाला.
आग लागल्याचं लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी अथक प्रयत्नांनंतर आजी-नातवाला बाहेर काढले. तातडीने या दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दोघांचीही स्थिती अतिशय गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. मात्र दरम्यान दोघांचाही मत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मरियम असं 60 वर्षीय महिलेचं नाव असून अयान असं नातवाचं नाव होतं. अयान अवघ्या तीन वर्षांचा होता. रात्रीच्या वेळेच मरियम आणि अयान खोलीत झोपलेले असताना अचानक आग लागली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी करत आहेत. मेणबत्तीमुळे आग लागली. त्यानंतर घरातील समानाने देखील पेट घेतला. आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.