हैदराबाद- पतीच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपात एका नवविवाहीतेला अटक झाल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडली आहे. विजिआनाग्राम भागात मंगळावरी ही घटना घडली आहे. पतीची हत्या करण्यासाठी या महिलेने बी टेक पदवी असलेल्या पण नोकरी नसलेल्या काही तरूणांना सुपारी दिली. त्यासाठी लग्नाची अंगठी तिने त्या टोळीला दिली.
सरस्वती (वय 22) असं आरोपी महिलेचं नाव आहे. सरस्वतीने सोमवारी पर्वतीपुरम विभागातील पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. पती गौरीशंकरसोबत दुचाकीवरुन जात असताना रिक्षेतून आलेल्या चोरट्यांनी आम्हाला गाठले. त्यांनी माझ्याकडील दागिने लुटले. त्यानंतर पतीची हत्या करुन तिथून पळ काढला, असं तिने तक्रारीत म्हटलं. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत परिसरात शोधमोहीम राबवली. पण, सरस्वतीच्या जबाबात पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने गुन्हाची कबूली दिली.
चौकशीत सरस्वतीने पोलिसांना सांगितलं की, 'माझे मधू शिवा या तरुणाशी प्रेमसंबंध असून या प्रेमसंबंधांसाठीच पतीच्या हत्येची सुपारी दिली. सरस्वतीची शिवाशी गेल्या वर्षी फेसबुकवर ओळख झाली होती. विशाखापट्टणम येथे शिक्षण घेत असताना तिची ओळख झाली होती. या ओळखीचं रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झालं. पण घरच्यांनी तिचं लग्न गौरीशंकरशी लावून दिलं. या लग्नसाठी ती खूश नव्हती. तिने लग्नाच्या १० दिवसांच्या आतच प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. त्या दोघांनी रामकृष्ण नामक एका स्थानिक गुंडाला हत्येची सुपारी दिली. या कामात त्याला दोन जणांनी मदत केली. सुपारी म्हणून तिने गुंडांना चक्क लग्नात सासरच्यांनी दिलेली सोन्याची अंगठी दिल्याचे समोर आले. याशिवाय तिने काही रोखरक्कमही गुंडांना दिल्याचं तपासात समोर आलं आहे.