नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत आज आश्चर्यकारक घटना घडली. द्वारका मोड मेट्रो स्थानकावर एका महिलेने दोन हजारच्या नोटेसाठी चक्क मेट्रोखाली उडी घेतली. यावेळी मेट्रो रेल्वे महिलेच्या अंगावरून गेली. सुदैवाने या घटनेत महिला थोडक्यात बचावली.
या अपघातात बचावलेली महिला झरोदा कला येथील रहिवासी आहे. महिलेने दिल्लीतील द्वारका मोड येथे मेट्रोसमोर उडी घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रोसमोर उडी घेतलेली महिला रुळाच्या मध्यभागी झोपली होती. त्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सीआरपीएफने मेट्रो सेवेत बाधा निर्माण केल्याबद्दल महिलेकडून माफीनामा लिहून घेतला.
ही घटना सकाळी 10 वाजून 40 मिनिटांची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलीची दोन हजारची नोट मेट्रोच्या रुळावर पडली होती. ती नोट उचलण्यासाठी तिने समोर आलेल्या मेट्रोची पर्वा न करता रुळावर उडी घेतली होती.