उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पाच मुलांची आई दिराच्या प्रेमात वेडी झाली. प्रियकरासाठी तिने घर आणि कुटुंब सोडले. ही महिला आपल्या दिरासोबत राहण्यावर ठाम होती. दोन दिवसांपूर्वी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी परस्पर सामंजस्याने प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. यानंतर रविवारी गावात पंचायत झाली.
दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनंतर पंचायतीने निर्णय घेतला की, महिला आणि तिचा प्रियकर गावात राहणार नाही. त्यांची पाचही मुलं वडिलांकडे राहतील. भविष्यात दोन्ही पक्ष कोणावरही कायदेशीर कारवाई करणार नाहीत. दोन्ही पक्षांनी हा करारनामा लेखी स्वरूपात पोलिसांना दिला आहे. पंचायतीच्या आदेशानंतर मुले रडतच राहिली, मात्र महिला प्रियकरासह निघून गेली.
कुंवरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेचे तिच्या दिरासोबत प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी महिलेने स्वत: पोलीस स्टेशन गाठलं आणि ती यापुढे तिच्या पतीसोबत नाही, तर तिच्या प्रियकरासोबत राहणार आहे असं सांगितलं. पोलिसांनी सोबत आलेल्या लोकांना सांगितलं की, दोन्ही कुटुंबांनी पंचायत घेऊन हे प्रकरण मिटवावे. यावर ग्रामस्थांनी प्रमुखाच्या नेतृत्वाखाली पंचायत बोलावली.
महिला, तिचा प्रियकर आणि पती यांच्यासह मोठ्या संख्येने लोक पंचायतीसाठी उपस्थित होते. पंचायतीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महिलेच्या आग्रहास्तव तिला प्रियकरसोबत राहायचे असेल तर गाव सोडावे लागेल, असा निर्णय दिला. महिलेने हे मान्य करत प्रियकरासह गाव सोडण्यास तयार असल्याचे सांगितले. पाचही मुले वडिलांसोबत राहतील, असा निर्णयही पंचायतीने घेतला, ज्याला महिलेने होकार दिला. महिलेचं 18 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.