लखनऊ - पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवाचौथ हे व्रत केलं जातं. मात्र लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला हे व्रत करणं चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने करवाचौथ व्रत केलं म्हणून कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांपासून जीव वाचवत तरुणीने पोलिसांत धाव घेतली मात्र पोलीस ठाण्यातही तिच्या नातेवाईकांनी जोरदार राडा करत गोंधळ घातला आणि पोलिसांसमोरच तरुणाला चोप दिल्याची माहिती मिळत आहे. लखनऊमध्ये ही घटना घडली असून याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तरुणी गेल्या दोन वर्षांपासून एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. बुधवारी तिने आपल्या प्रियकरासाठी करवाचौथचं व्रत केलं होतं. करवाचौथ व्रताची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली तेव्हा ते जबरदस्तीने तरुणीच्या घरात घुसले आणि तरुणीसह तिच्या प्रियकरालाही बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान या प्रकरणी न्याय मागण्यासाठी हे दोघेही अरविंदो पोलीस ठाण्यात पोहोचले.
पीडित तरुणीच्या भावाला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल
पोलिसांसमोर देखील तरुणीच्या कुटुंबीयांनी खूप गोंधळ घातला आणि तिला मारहण केली. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पीडित तरुणीच्या भावाला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कुटुंबीयांना अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बाबो! Amazon वरुन 40 हजारांचा मोबाईल मागवला अन् पार्सल उघडताच धक्काच बसला
ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. अॅमेझॉनवरून एका व्यक्तीने तब्बल 40 हजारांचा मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र पार्सल उघडून पाहिल्यावर त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीलीभीतच्या कनक गावात राहणाऱ्या हरदीप सिंह याने 24 ऑक्टोबरला ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला होता. अॅमेझॉनवरून हा फोन मागवण्यात आला असून त्याची किंमत जवळपास 40,000 रुपये होती. पार्सल घरी आल्यावर त्याने जेव्हा ते उघडलं तेव्हा त्याची निराशा झाली कारण त्यामध्ये मोबाईल नव्हताच. मोबाईल ऐवजी एक ड्रेस पार्सलमध्ये होता. संतप्त झालेल्या हरदीपने कंपनीला फोन केला. तेव्हा कंपनीने त्याच्याकडे सात दिवसांचा कालावधी मागून घेतला.