नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीमधील सर्वात पॉश समजल्या जाणा-या कनॉट प्लेसमध्ये एका महिलेसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आरोप केला आहे की, एका अज्ञात व्यक्तीने ऑफिसच्या छतावर जबरदस्ती तिचा हात पकडला आणि हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. महिलेने पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'पीडित महिलेने सांगितलं आहे की, लंचच्या वेळी मी ऑफिसच्या छतावर गेली होती. त्यावेळी एक व्यक्ती पाठलाग करत मागे आला होता'.
पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार, आधी आरोपीने वाईट नजरेने तिला एकटक पाहण्यास सुरुवात केली आणि नंतर तिच्या दिशेने चालत आला. पीडितेच्या जवळ आल्यानंतर त्याने आधी तिच्या शरिराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलने आरोपीला मागे ढकललं आणि दरवाजाच्या दिशेने पळाली. मात्र दरवाजा लॉक केलेला होता. आरोपीनेच दरवाजा लॉक केला होता असा दावा पीडित महिलेने केला आहे. यानंतर आरोपीने पीडित महिलेला पकडलं आणि आपल्या पँटची चेन काढून घाणेरड्या पद्धतीने स्वत:ला स्पर्श करु लागला.
आपण धमकीदेखील दिली, मात्र त्याने काहीच ऐकलं नाही असं पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे. पीडित महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात करताच, आरोपीने तिच्या हातातील फोन खेचून घेतला आणि दुस-या छतावरुन पळून गेला. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरु आहे.
देशभरात गेल्या काही दिवसांपासून महिलांसंबंधी गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागल्याचं दिसत आहे. मात्र हे गुन्हे रोखण्यासाठी कठोर पाऊलं उचलली जात नसल्याने रोष व्यक्त होत आहे. याआधी संसद भवनजवळ मेट्रो स्टेशनच्या आत एका महिला पत्रकाराची छेड काढल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आरोपीने स्टेशनच्या पाय-यांवर महिला पत्रकाराची छेड काढली होती. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली होती.