एक तरुणी ट्रॅकवर धावली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिचा पाठलाग केला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर तिला वाचवण्यात यश आलं. या तरुणीच्या जीवाला धोका असल्याचं पाहून मेट्रो पायलटने ब्रेक दाबत ट्रेन थांबवली, त्यामुळे ब्लू लाईनवर काही काळ मेट्रोचं कामकाज ठप्प झालं.
एका महिलेने मेट्रो ट्रॅकवर धावत जाणून चालत्या मेट्रोसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र मेट्रो सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये ही घटना रेकॉर्ड केली आणि ती सोशल मीडियावर शेअर केली. प्रवाशाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तीन सुरक्षा कर्मचारी धावताना दिसत आहेत. एक मेट्रो ट्रॅकवर उभी असलेली दिसते.
इंडिया टुडेने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं की, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रॅकवरून धावणाऱ्या महिलेला पकडलं आणि तिला मेट्रो पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (४ सप्टेंबर) दुपारी १.४७ च्या सुमारास राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर एका महिलेने मेट्रो ट्रेनमधून उतरल्यानंतर ट्रॅकवर उडी मारली, मात्र काही मीटर धावल्यानंतर ती खाली पडली आणि बेशुद्ध झाली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
४ सप्टेंबर रोजी मेट्रो ट्रेन पीएफ क्रमांक १ वर (द्वारका ते वैशाली) थांबताच एक महिला धावू लागली. ती ट्रॅकवर उतरली आणि काही मीटर धावल्यानंतर बेशुद्ध झाली. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्यानी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजनेही घटनेची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये ती उतरताना आणि प्लॅटफॉर्मवर आणि नंतर ट्रॅकवर धावताना दिसते.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांना कळलं की, ही तरुणी तिच्या आई-वडिलांसोबत पश्चिम दिल्लीतील नवादा भागात राहते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रियाचे वडील रमेश, व्यवसायाने शिंपी आहेत, तिच्यावर मानसिक उपचार सुरू आहेत. तरुणीला रुग्णालयातून सोडण्यात आलं आणि सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.