हैदराबाद - सोशल मीडियावरील #MeToo या हॅशटॅगमुळे लैंगिक शोषणाविरोधात एक प्रकारचे कॅम्पेन सुरु झाले आहे. अनेक महिला स्वत:हून समोर येऊन फेसबुक, टि्वटरच्या माध्यमातून लैंगिक शोषणा विरोधात आवाज उठवत आहेत. हैदराबादमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये राहणा-या उमा शर्मा या महिलेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उबर टॅक्सीने प्रवास करताना आलेला एक भयानक अनुभव सांगितला आहे.
उमा शर्मा या उबर टॅक्सीने हैदराबाद विमानतळावर चालल्या होत्या. त्यावेळी ड्रायव्हरने आउटर रिंग रोडच्या निर्जन रस्त्यावर गाडीचा वेग कमी केला. तो गाडीतल्या आरशामधून मागे बसलेल्या उमा यांच्यावर चोरटा कटाक्ष टाकत होता. ड्रायव्हरने गाडीचा वेग का कमी केलाय ते उमा यांच्या लक्षात येत नव्हते. पाच मिनिटांनी ड्रायव्हर गाडीतच हस्तमैथुन करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उमा यांनी त्याला काय करतोय म्हणून जाब विचारला तेव्हाही तो शांत होता. त्यांच्या चेह-यावर कुठलेही भितीचे भाव नव्हते.
मी आरडाओरडा केल्यानंतर त्याने गाडी थांबवली. त्यानंतरही तो निघून गेला नाही, तो तिथेच थांबून होता. मी त्याचा फोटो काढला व त्याला पोलीसात देण्यात धमकी दिली असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर उमा यांनी दुसरी टॅक्सी बुक केली व त्या विमानतळावर गेल्या. उमा यांच्यासारख्याच दुस-या महिलाही अशा परिस्थितीतून गेल्या असतील. त्यांनी समोर येऊन अशा प्रकारांना वाचा फोडावी यासाठी उमा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा भयानक अनुभव शेअर केला आहे.
ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. या मुद्दयावर बोलताना हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं माझ्यासोबतही असं घडलं आहे म्हणत #Me Too ट्विट केलं आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झालं. या कॅम्पेनला दुनियाभरातून महिलांचा सहभाग मिळतो आहे. या कॅम्पेनला आता मुंबई पोलिसांनीही पाठिंबा दिला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत या कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे. शारीरिक शोषणाबद्दल लोक ऑनलाइन मत मांडतं आहेत. ही चांगली सुरूवात आहे. आता या तक्रारींवर आम्हाला ऑफलाइन कायदेशीर करून अजून चांगली सुरूवात करू द्या. असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
कोलकाता पोलिसांनीही दिला #MeToo कॅम्पेनला पाठिंबा
काही दिवसांपूर्वी कोलकाता पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून कॅम्पेनला पाठिंबा दिला होता. कोलकाता पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लैंगिक शोषणाच्या विरोधात महिलांनी मजबूत व्हावं, असं म्हंटलं. तसंच या मुद्द्यावर पोलीस संतप्त असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. लैंगिक शोषणाच्या प्रत्येक तक्रारावीर कठोर पाऊलं उचलणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हंटलं आहे. महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असंही कोलकाता पोलिसांनी म्हंटलं.
काय आहे #Me Tooअभिनेत्री एलिसा मिलानो हिने शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य जगासमोर येण्यासाठी ट्विट केलं. 'आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक शोषण झालेल्या महिलांनी जर #Me Too लिहून स्टेटस शेअर केला, तर कदाचित स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव लोकांना होईल,' असे ट्विट तिने केलं आणि जगभरातील महिला याविषयी आपली मतं मांडू लागल्या.
भारतातही ट्रेडिंगया कॅम्पेनमध्ये हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव शेअर केले. भारतातही हा हॅशटॅग ट्रेंड झाला. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अनेक मुली आपल्याला आलेले असे वाईट अनुभव लोकांसमोर मांडले.