अजमेर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. रुग्णसंख्या कमी होत असताना लसीकरण अभियानाला वेग देण्याचं काम सुरू आहे. देशात आतापर्यंत १८ वर्षांच्यावरील ३० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं आहे. मात्र आजही काही ठिकाणी जनजागृती होण्याची गरज आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे.
अजमेरमधील पिसांगन पंचायत समितीच्या क्षेत्रात येणाऱ्या नागेलाव गावात आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी आले होते. त्यावेळी एका महिलेनं लस टोचून घेण्यास नकार दिला. या महिलेनं जोरदार गोंधळ घातला. महिला केवळ गोंधळ घालून थांबली नाही, तर तिनं लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर साप सोडण्याची धमकी दिली.
नागेलाव गावातील काही ग्रामस्थांचं लसीकरण पूर्ण व्हायचं आहे. त्यांच्या घरात जाऊन लसीकरण केलं जात आहे. शुक्रवारी आरोग्य कर्मचारी एका महिलेच्या घरी लस टोचण्यासाठी गेले. तिनं सुरुवातीला लस घेण्यास नकार दिला. कोरोना लस टोचून घ्या असा आदेश सरकारनं दिल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यावरून तिनं अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. थोड्या वेळानं ती झोपडीतून एक टोपली घेऊन आली. त्यातून साप बाहेर काढून ती आरोग्य कर्मचाऱ्यांना घाबरवू लागली.
साप पाहून आरोग्य कर्मचारी घाबरले. मात्र तरीही त्यांनी महिलेची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. हा प्रकार पाहून गावकरी महिलेच्या घरासमोर जमले. कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लस घेणं गरजेचं असल्याचं कर्मचाऱ्यांनी महिलेला समजावलं. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर महिला लस घेण्यास तयार झाली. तिच्यासोबत कुटुंबीयांनीदेखील लस घेतली.