नवी दिल्ली:16 ऑगस्ट रोजी एक महिला आणि एका पुरुषानं सर्वोच्च न्यायालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. न्यायालयाच्या गेट क्रमांक डी वर या दोघांनी स्वतःला पेटवून घेतलं होतं. त्या घटनेतील महिलेचा आज मृत्यू झाला आहे. यापूर्वी, 21 ऑगस्ट रोजी तिच्यासोबत असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला होता.
आत्महत्या केलेल्या महिलेनं उत्तर प्रदेशातील घोसी येथील खासदार अतुल राय यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तर या घटनेत मृत्यू झालेला व्यक्ती त्या प्रकरणातील साक्षीदार होता. अनेक दिवसांपासून ही महिला न्यायाच्या प्रतिक्षेत होती. पण, अनेक प्रयत्न करुनही न्याय न मिळाल्यानं महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. स्वतःला आग लावण्यापूर्वी हे दोघेही सोशल मीडियावर लाइव्ह आले होते. यामध्ये महिलेने स्वत:ला बलात्कार पीडित असल्याचं सांगत न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त केली होती.
काय आहे नेमकं प्रकरण ?16 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आत जाण्याचा प्रयत्नात असलेल्या या महिला आणि पुरुषाला ओळखपत्र नसल्यामुळे आत जाऊ दिलं नव्हतं. त्यानंतर त्या दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या गेट क्रमांक डी जवळ स्वतःला पेटवून घेतलं होतं. काही वेळातच त्या दोघांना पोलीसांनी मनोहर राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केलं होत. तीन दिवसांपूर्वी या घटनेतील पुरुषाचा आणि आज या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.