जोधपूर - राजस्थानच्या झुंझनू येथील खासदार संतोष अहलावत यांनी आपल्या मुलीच्या लग्नात मुलगा - मुलगी समानतेचा संदेश दिला आहे. लग्नात मुलाला नेहमी घोड्यावरुन घेऊन जाण्याची प्रथा असते. मात्र संतोष अहलावत यांनी आपल्या मुलीला मुलाप्रमाणे घोड्यावर बसवलं होतं. लोकांनाही वधू घोड्यावर बसलेली पाहून आश्चर्य वाटत होतं. सोशल मीडियावर गार्गीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती फेटा बांधून घोड्यावर बसलेली असल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी तिची खासदार आई आणि इतर महिला राजस्थानी लोकनृत्याचा आनंद घेत आहेत.
राजस्थानमध्ये लग्नाआधी 'बंदोरी' नावाच्या एका प्रथेचं पालन केलं जातं. याला 'बिंदोरी' आणि 'बिनोरी' असंही म्हटलं जातं. ही प्रथ नवरामुलगा निभावतो. या प्रथेनुसार नव-यामुलाला घोडी किंवा रथावर बसवून मंदिर तसंच इतर ठिकाणी नेलं जातं. यावेळी वर आणि वधू पक्षातील लोक आणि नातेवाईक एकत्र येऊन आनंद साजरा करतात. संतोष अहलावत यांच्या मुलीने ही प्रथा निभावली असून, समाजात समानतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
खासदार संतोष अहलावत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'मी नेहमीच समाजात जागरुकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. मी मुलगा आणि मुलीला समान वागणूक मिळावी यासाठी मोहिम राबवावी अशी माझ्या मुलीची इच्छा होती. म्हणूनच मी याची सुरुवात माझ्याच घरातून करावी असं ठरवलं'. मुलीच्या लग्नाआधी तिला घोडीवर बसवून 'बंदोरी' प्रथेचं पालन करण्यात आलं.
संतोष अहलावत यांनी पुढे बोलताना सांगितलं की, त्यांच्या मुलीला घोडीवर बसलेलं पाहून नागरिकांमध्येही उत्साह होता. आपल्याला महिलांचंदेखील समर्थन मिळत असून त्यांनीदेखील आफल्या मुलांना समानतेची वागणूक देणार असल्याचा निर्धार केला आहे. आपण फार पुर्वीपासून 'मुलगी वाचवा मुलगी शिकवा' संदेश देत आहोत.
गार्गी अहलावतने ब्रिटनमध्ये एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. गार्गीचा 8 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे, आणि 10 फेब्रुवारीत दिल्लीत रिसेप्शन होणार आहे.