ऑनलाइन लोकमत
तेलंगणा, दि. 10 - 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. दरम्यान, तेलंगणामधून एक हैराण करणारी बातमी आली आहे. येथे एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. नोटा बंद करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटा आता रद्दी झाल्या या विचाराने महिला चिंतेत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणाच्या महबूबाबादयेथील शनिगापुरम गावात राहणारी कंडुकुरी विनोदा आणि तिचा पती उपेन्द्रिया यांनी तीन महीन्यापुर्वी 12 एकर जमीन विकली होती त्याबदल्यात त्यांना 55 लाख रूपये रोख मिळाले होते. त्यांना नवी जमिन खरेदी करायची होती त्यामुळे त्यांनी पैसे बॅंकेत जमा करण्याएवजी घरात ठेवले होते. नोटा बंद करण्याचं वृत्त आल्यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं होतं असं महिलेचा मुलगा श्रीनिवासने सांगितलं. विनोदा शेतकरी होती आणि तिचं शिक्षण कमी झालं होतं. नोटा बदलण्याच्या उपाययोजनांबाबत तिला काही माहित नव्हतं आणि आपल्याला मोठं नुकसान झालं असा तिचा समज झाला. स्थानिक पोलिस या घटनेची पुढील चौकशी करत आहेत.