प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. गरिमा शर्मा (SDM) आणि शिल्पा सक्सेना (RAS) यांनी RAS परीक्षा उत्तीर्ण करून नवीन विक्रम रचला. गरिमा यांनी वयाच्या 51 व्या वर्षी आणि शिल्पा यांनी वयाच्या 47 व्या वर्षी हे करून दाखवलं आहे. या सरकारी नोकरीसाठी त्यांनी दुप्पट काम तर केलेच शिवाय मुलं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासूनही लांब राहिल्या.
गरिमा शर्मा यांनी जयपूरच्या अनेक नामांकित शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम केले असून त्यांचे पती सरकारी नोकरी करायचे. गरिमानेही सरकारी नोकरीची तयारी करावी, अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, दोन वर्षे गंभीर आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यानंतर गरिमा यांनी वयाच्या 51 व्या वर्षी आरएएसची परीक्षा दिली.
2015 मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 2016 च्या भरतीमध्ये, त्यांनी स्कूल लेक्चरर, कॉलेज लेक्चरर आणि RAS-2016 परीक्षा पास केल्या होत्या. त्यानंतर त्या तहसीलदार झाल्या. 2018 मध्ये पुन्हा RAS साठी परीक्षा दिली. यामध्ये त्यांना विधवा प्रवर्गात वयात सवलत मिळाली. शेवटी 2021 मध्ये, त्या बागोडाच्या SDM म्हणून रुजू झाल्या.
2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने पतीच्या निधनानंतर, राजस्थानच्या शिल्पा सक्सेना यांना खूप संघर्ष करावा लागला. त्यांनी अधिकारी व्हावे अशी त्यांच्या पतीची इच्छा होती पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने तयारी करण्याची संधी मिळाली नाही. शिल्पा यांनी आरएएस परीक्षेची तयारी सुरू केली तेव्हा तिची धाकटी मुलगी चौथीत आणि मोठी मुलगी सहावीत होती.
वयाच्या 43 व्या वर्षी शिल्पा यांनी पुन्हा एकदा पुस्तकं वाचली. रोज 10-12 तास अभ्यास करायच्या. त्या काळात त्यांच्या मुलींचा सांभाळ त्यांच्या आईने केला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई आणि मुलींनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तेव्हा शिल्पा यांनी ठरवले होते की अधिकारी झाल्यावरच मरायचं. RAS बॅच 2021 च्या शिल्पा सक्सेना सध्या उदयपूरमध्ये अतिरिक्त कोषागार अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.