अमरावती- आंध्र प्रदेशातल्या एका गावामध्ये एक अजब नियम लागू करण्यात आला आहे. टोकलपल्ली गावातल्या वयोवृद्ध पंचांनी हा निर्णय जाहीर केला आहे. जर महिलेनं दिवसा नाइट गाऊन घातला, तर तिला 2 हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात माहिती दिली आहे. एवढंच नव्हे, तर दिवसा नाइट गाऊन घालणाऱ्या महिलांसंदर्भात माहिती देणाऱ्यालाही एक हजार रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.टोकलपल्ली गाव हे आंध्र प्रदेशातल्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात स्थित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतून गावाचा विकास केला जाणार आहे. या गावात जवळपास 11 हजार कुटुंबीयांतले जवळपास 36 हजार लोक राहतात. विशेष म्हणजे गावात तहसीलदार आणि सब इन्स्पेक्टर यांनी दौरा केला असून, त्यावेळी कोणत्याही महिलेनं या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवलेला नाही.रिपोर्टनुसार, आतापर्यंत कोणत्याही महिलेला दंड ठोठावण्यात आला नाही. तसेच हा निर्णय महिलांच्या सहमतीनं घेण्यात आल्याची माहिती एका गावकऱ्यानं दिली आहे. तर काहींनी ही अफवा असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. परंतु महिला या नियमांनी खूश असल्याचा दावाही काहींनी केला आहे.
दिवसा नाइट गाऊन घातल्यास महिलांना होणार 2 हजारांचा दंड, 'या' गावानं काढला अजब फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 7:37 PM