मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या मेट्रोसिटीतही महिला असुरक्षित असल्याचे समोर आले. गेल्या ८ महिन्यांत महिलांवरील अत्याचाराचे अडीच हजार गुन्हे नोंद झाले. त्यात दोषसिद्धीचे प्रमाण अवघे ३० टक्के आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ८ महिन्यांत मुंबईत महिला अत्याचाराचे २, ५७६ गुन्हे नोंद झाले. यापैकी १,८३३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. तर, गेल्या वर्षी नोंद झालेल्या ४,३४९ गुन्ह्यांपैकी ३,२९८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती.
लॉकडाऊनचे सुरुवातीचे काही दिवस सोडले, तर मुख्यत्वेकरून एप्रिल, मे महिन्यात गुन्हेगारीत घट झाली. शहरात दिवसाला दाखल होणाऱ्या बलात्काराच्या सरासरी तीन गुन्ह्यांचे प्रमाण घटून दर दोन दिवसांत एका गुन्ह्यावर आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अर्ध्यावर असला, तरी यात जून, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येते.
आॅगस्टमध्ये ३३४ अत्याचारांच्या गुन्ह्यांची नोंद झाली. ३२ अल्पवयीन मुलींसह एकूण ५४ महिला वासनेच्या शिकार ठरल्या. ७६ अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण झाले, तर विनयभंगाच्या १२९ घटना घडल्या.गुन्ह्याचा शेवट कारागृहातच - परमबीर सिंहमहिलांवरील अत्याचाराविरोधात मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटर हँडलवरून जनजागृती सुरू केली आहे. विविध कारवाईतील आरोपींची माहिती सोशल मीडियावर जाहीर केली जाते, जेणेकरून गुन्हा करण्यापूर्वी आरोपींनी १० वेळा विचार करावा. पोलिसांनी रात्री-अपरात्री गस्तही वाढविली आहे. कुठल्याही गुन्ह्याचा शेवट कारागृहातच होतो. महिलांनी गुंडगिरीला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सोशल मीडियावरून केले.
सर्वात जास्त गुन्हे दिल्लीत -च्एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील घेतलेल्या आढाव्यातील गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, महिलांविरोधी सर्वात जास्त गुन्हे दिल्लीत (१२,९०२) घडले. त्यापाठोपाठ मुंबईत ६,५१९, तर नागपूर शहरात १,१४४ गुन्हे नोंद झाले. च्नागपूरमध्ये महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित ९६ टक्के खटले प्रलंबित आहेत. दोषसिद्धीचा दर १० टक्क्यांहूनही कमी आहे. मुंबईत तो ३० टक्क्यांवर आहे.