भोपाळ - संसारात पती पत्नीत अनेक कारणांवरून भांडणं ही होत असतात. काही वेळा सततच्या भांडणाला वैतागून घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय देखील घेतला जातो. क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट मागितल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. पण जर कोणी पती अंघोळ करत नाही म्हणून घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. मध्य प्रदेशचा राजधानी भोपाळमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. पती सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी करत नाही म्हणून एका पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये पतीच्या सात-आठ दिवस अंघोळ आणि दाढी न करण्याच्या वाईट सवयीला कंटाळलेल्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे. 25 वर्षाचा तरुण आणि 23 वर्षाची तरुणी यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. पतीच्या वाईट सवयीला पत्नी कंटाळली होती. तिने अनेकदा पतीला समाजून या सवयीत बदल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने अद्याप आपल्या सवयीत बदल केलेला नाही. यामुळेच पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण आहे. दोघांच्या संमतीनंतर त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे समुपदेशक शैल अवस्थी यांनी सांगितले. घटस्फोट हवा असल्यास दोघांना सहा महिने एकमेकांपासून दूर राहावे लागेल असे न्यायाधीश आर.एन.चंद यांनी सांगितले आहे.
आंघोळ न केल्याने पतीच्या शरीराचा दुर्गंध येतो आणि अंघोळ करण्यास सांगितल्यावर तो कपड्यांवर अत्तर लावतो अशी तक्रार असल्याची माहिती मिळत आहे. पती घरातील सामान नीटपणे ठेवत नाही असं देखील पत्नीने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे. तसेच भविष्याचा विचार करता पती पैसे वाचवत नाही असं पत्नीचं म्हणणं आहे. दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आता न्यायालयाने दोघांना सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. माझे आयुष्य आहे. ते कसे जगायचे हे मी ठरवेन. पत्नीने मला सांगायची गरज नाही असे पतीने म्हटले आहे. तसेच पत्नीच्या सांगण्यावरून आपण बदलणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.