नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील जिल्हा रुग्णालयात बुधवारी अतिशय विदारक चित्र पाहायला मिळाले. मन हेलावून टाकणारी एक घटना घडली आहे. एका हतबल मातेने आपल्या निष्पाप मुलीला हातगाडीवरून गंभीर अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी बालरोग तज्ज्ञांनी मुलीवर प्राथमिक उपचार केले आणि नंतर तिला अधिक चांगले उपचार मिळावे यासाठी वाराणसीला रेफर केले. मात्र डॉक्टर रेफरचे पेपर्स करत असताना मुलीचा मृत्यू झाला.
आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीने जीव सोडला. यामुळे दोघांना मोठा धक्का बसला. त्यांनी स्वत: ला सावरलं आणि हातगाडीवर मुलीचा मृतदेह ठेवला आणि घरी जाण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला, त्यानंतर सीएमओने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ जिल्ह्यातील लाईन बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मातापूरचा आहे. येथे राहणाऱ्या रेखा देवी यांची सात महिन्यांची मुलगी नीतू हिला श्वसनाचा त्रास होता. मंगळवारी, 17 मे रोजी मुलीची प्रकृती बिघडली. त्यानंतर रेखा देवी पती सुरेश कुमार पटेल यांच्या हातगाडीवरून मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचली.
मुलीची प्रकृती चिंताजनक असलेली पाहून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र याच दरम्यान मुलीची प्रकृती आणखी बिघडल्याने डॉक्टरांनी तिला वाराणसीला रेफर केले. मुलीच्या रेफरसाठी पेपर बनवत असतानाच मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर हताश झालेल्या आई-वडिलांनी तिचा मृतदेह त्याच हातगाडीवर ठेवला आणि ते घरी गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.