इदुक्की, दि. 7- केरळमध्ये बुधवारी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का लावणारी घटना घडली. नातेवाईकांनी मृत ठरविण्यात आलेली आजारी महिलेला मोबाइल शवगृहात घेऊन जाण्याच्या आधी ती महिला पुन्हा जिवंत झाल्याची घटना समोर आली आहे. रत्ना अम्मा (51) असं त्या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
रत्ना अम्मा या गंभीर स्वरूपात आजारी होत्या. गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्यावर तामिळनाडुतील मदुरैमध्ये असलेल्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रत्ना अम्मा यांची प्रकृती काही प्रमाणात स्थिर असून त्यांना घरी घेऊन जाऊ शकता, असं सांगत डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला होता. रत्ना यांचे नातेवाईक बुधवारी त्यांना घरी घेऊन गेले होते. घरी गेल्यावर रत्ना यांच्या शरीरात काही हालचाली दिसल्या नाही. त्यामुळे रत्ना यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं. त्यांचा मृतदेह मोबाइल शवगृहात ठेवण्यासाठी नेत असताना काही शेजारच्या लोकांनी रत्ना यांच्या हाताच्या हालचाली पाहिल्या. दरम्यान, या प्रकरणी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली आणि रत्ना यांना सेंट जॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. रत्ना यांची प्रकृती सध्या नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
याआधी तेलंगणमधील वारंगलमध्ये असा एक प्रकार घडला होता. तेथे मृत म्हणून घोषित केलेलं मूल अंत्यसंस्काराच्या आधी जिवंत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. तेलंगणमधील वारंगल जिल्ह्यातही धक्कादायक घटना घडली आहे. एमजीएम हॉस्पिटलने बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेचच मृत घोषित केलं होतं. हॉस्पिटलने बाळ मृत असल्याचं सांगत कुटुंबाच्या हवाली केलं. यानंतर कुटुंबियांनी नवजात बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. पण अचानक त्यांना बाळाच्या शरिरात हालचाल होत असल्याचं लक्षात आलं. त्यांना तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात बाळावर उपचार करण्यात आले, मात्र ते वाचू शकलं नाही.