नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,05,42,841 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15,158 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 175 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,52,093 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा आजपासून शुभारंभ झाला आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. मात्र याच दरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे.
"माझी आता इच्छा नाही, मी लस टोचून घेणार नाही" असं म्हणत कोरोनाच्या लसीकरणाला थेट नकार देण्यात आला आहे. डॉक्टर अन् नर्सचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात येथील भोगनीपूर तहसील क्षेत्राअंतर्गत पुखराया सीएससीमध्ये ही घटना घडली आहे. महिला स्टाफ नर्स गीताने सीएससी परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू केला होता. यानंतर सीएससीमध्ये तैनात असलेल्या एका महिला डॉक्टरने कोरोनाची लस घेण्यास नकार दिला. आता माझी इच्छा नाही म्हणून मी कोरोना लस टोचून घेण्यास नकार दिला असं डॉक्टर प्रियंकाने म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारा देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात 317 केंद्रांवर लसीकरण अभियानाची सुरुवात झाली आहे. आज 31700 लोकांना कोरोनाची लस टोचली जात आहे. सर्वात आधीही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचं लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने याची तयारी पूर्ण केली आहे.आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात 10 लाख 55 हजार 500 कोविशील्ड आणि 20,000 कोवॅक्सीचे इंजेक्शन मिळाले आहेत. प्रदेशातील 8 लाख 57 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"आज मी अत्यंत आनंदी व समाधानी, कोरोना विरोधातील लढ्यात ही लस ठरणार संजीवनी"
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशात सुरू असलेल्या मोहिमेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही लस कोरोना महामारीच्या विरोधात संजीवनीसारखं काम करेल असं म्हटलं आहे. "मी आज अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोरोना विरोधात लढाई लढत आहोत. कोरोना विरोधातील लढ्यात ही लस "संजीवनी" म्हणून काम करेल. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे" असं यांनी हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. तर कोरोनावरील लस केव्हा येणार, असा प्रश्न विचारणाऱ्या सर्वांनाच मी हे सांगू इच्छितो की, लस आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे, असं मोदी यांनी सांगितलं.
डॉ. हर्षवर्धन यांनी "आपण या अगोदरही पोलिओ व कांजण्यासारख्या आजारांना नष्ट केलं आहे. भारताकडे अशाप्रकारच्या संकटांना सामोरं जाण्याचा बराच अनुभव आहे. हे कदाचित जगातील सर्वात मोठी लसीकरण अभियान आहे" असं म्हटलं आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पोलीस यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. पहिला आणि दुसरा डोस यामध्ये एक महिन्याचे अंतर ठेवले जाणार आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्याने कोरोनाविरोधाची प्रतिकारशक्ती तयार होईल. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.