ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - जुन्या नोटा बदलून मिळत नसल्याने निराश झालेली एक महिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गेटसमोरच टॉपलेस झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. ही महिला तिच्या जुन्या नोटा आरबीआयमधून बदलून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण सुरक्षारक्षक तिला बँकत जाऊ देत नव्हते.
या महिलेला जेव्हा सुरक्षारक्षकांनी गेटसमोरुन जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या महिलेने सरळ अंगातले कपडे काढले व तशीच टॉपलेस गेटसमोर बसली. या महिलेसोबत तिचे लहानगे मूल होते. तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींना महिलेची ही कृती पाहून धक्काच बसला.
आरबीआयच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांना बोलावल्यानंतर पोलिस या महिलेला तिच्या मुलासह पोलिस स्थानकात घेऊन गेले. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरीक आरबीआय बँकेत आले होते. रद्द झालेल्या नोटा बदलण्याची बँकांमधील मुदत संपली असली तरी, 31 मार्चपर्यंत आरबीआयच्या निवडक शाखांमध्ये नोटा बदलून मिळणार आहेत.