नवी दिल्ली : दुर्दम्य आत्मविश्वास आणि धाडसाच्या बळावर एक-एक शिखर यशस्वीपणे पादाक्रांत करणाऱ्या महिलांसाठी आता आकाश आणखी ठेंगणे झाले आहे. केंद्र सरकारने भारतीय वायुसेनेत महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून काम करू देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथमच महिला देशाच्या सशस्त्र दलात लढाऊ विमानांच्या वैमानिकाच्या भूमिकेत दृष्टीस पडतील.एअर फोर्स अकादमीतून यंदा उत्तीर्ण होणाऱ्या तुकडीतून महिला फायटर पायलटची निवड करण्यात येईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आली. प्रारंभिक प्रशिक्षणानंतर जून २०१६मध्ये त्यांना वायुसेनेच्या लढाऊ दलात कमिशन देण्यात येईल आणि एक वर्षाच्या सखोल प्रशिक्षणानंतर जून २०१७पर्यंत हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे सारथ्य महिलांच्या हाती येईल. कामगिरी प्रशंसनीयभारतीय महिलांच्या आकांक्षा आणि विकसित देशांमधील सशस्त्र दलांची प्रचलित व्यवस्था लक्षात घेऊन हे प्रगतशील पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय वायुसेनेच्या परिवहन आणि हेलिकॉप्टर बेड्यातील महिलांची कामगिरी प्रशंसनीय असून, त्या खऱ्या अर्थाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्याचे संरक्षण विभागाने हा निर्णय जाहीर करताना नमूद केले आहे.वायुदलप्रमुख एअर चिफ मार्शल अरूप राहा यांनी गेल्या महिन्यात वायुसेनादिनी वायुसेना महिला वैमानिकांना लढाऊ विमानांच्या उड्डाणांची परवानगी देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीसुद्धा या योजनेला दुजोरा देत लवकरच निर्णय होणार असल्याची ग्वाही दिली होती. वायुसेनेत आतापर्यंत लढाऊ दल वगळता इतर सर्व शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत होती. परंतु या निर्णयामुळे वायुसेनेच्या सर्व शाखांची दारे महिलांसाठी खुली झाली आहेत.1992 पासून भारतीय वायुसेनेत महिलांचा समावेश झाला.110 महिला पायलट सध्या वायुसेनेत आहेत; मात्र त्यांच्यावर लढाऊ विमानांची जबाबदारी देण्यात आली नव्हती.1300 महिला अधिकारी वायुसेनेत कार्यरत आहेत.2013 साली पाकिस्तानात २६वर्षीय आयशा फारूक लढाऊ विमानाची पहिली महिला वैमानिक बनली होती.
महिलाही ‘फायटर’
By admin | Published: October 25, 2015 4:31 AM