Hijab Controvercy: हिजाब परिधान न केल्यास महिलांवर बलात्कार होतो; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:47 PM2022-02-13T19:47:39+5:302022-02-13T19:49:02+5:30
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली: कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटत आहेत. अनेक सत्ताधारी आणि विरोधी नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता कर्नाटकमधीलकाँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
जमीर अहमद माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब याचा अर्थ पडदा, असा आहे. हिजाबमुळे महिलांचे सौंदर्य दिसत नाही. तसेच महिलांनी हिजाब परिधान न केल्यास त्यांच्यावर बलात्कार होतो, असं वादग्रस्त विधान जमीर अहमद यांनी केलं आहे.
#WATCH | Hijab means 'Parda' in Islam...to hide the beauty of women...women get raped when they don't wear Hijab: Congress leader Zameer Ahmed on #HijabRow in Hubli, Karnataka pic.twitter.com/8Ole8wjLQF
— ANI (@ANI) February 13, 2022
भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा डाव-
११ फेब्रुवारीच्या आयबी अलर्टनुसार पन्नूने भारतीय मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. हिजाबवर लावलेली बंदी उद्या अजान आणि कुराणवर लावली जाईल. त्यासाठी विरोध करण्याची वेळ आता आली आहे. भारताला उर्दुस्तान बनवा. मुस्लिमांचा वेगळा देश बनवलेल्या पाकिस्तानकडून शिका असं त्याने म्हटलं आहे.
हिजाब वादाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि सर्व एजन्सीला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिजाब रेफरेंडमसाठी एक वेबसाईट बनवण्यात आली आहे. त्यात लोकांना ऑनलाईन सपोर्ट करण्यासाठीही सांगितले जात आहे. या सर्व योजनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चा हात असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेने दावा केला आहे.
काय आहे हिजाबचा वाद?
कर्नाटकातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरुन गोंधळ सुरू आहे. कर्नाटकातील एका कॉलेजचा व्हिडिओ समोर आला होता. जिथे एक मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांच्या जमावाने मुलीसमोर जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर, मुलगीही अल्लाहू अकबरचा नारा देत उत्तर देते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
हिजाब वादाचे पडसाद पाकिस्तानातही उमटले-
हिजाब वादाचे पडसाद पाकिस्तानातही उमटले आहेत. नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मुलींना अशा प्रकारे हिजाब घालून प्रवेश करण्यापासून रोखणे भयावह असल्याचे तिने म्हटले. मलालाने ट्विट करून लिहिले - हिजाब परिधान केलेल्या मुलींना शाळेत प्रवेश करण्यापासून रोखणे हे भयानक आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे.