लातूर : साई फाऊंडेशनच्या प्रमुख अॅड. रुद्राली पाटील चाकूरकर यांच्या आरोग्य, शिक्षण व कायदेविषयक जनजागरण उपक्रमांची ब्रिटिश उच्चायुक्तालयाने ‘वूमेन इन्स्पायर’ मालिकेत दखल घेतली आहे. आजवर भारतातील तीन संस्थांच्या कार्याचा आलेख उच्चायुक्तालयाने एका माहितीपटाद्वारे जगासमोर ठेवला असून, त्यात साई फाऊंडेशनची नोंद झाली आहे.
भारतातील युवक-युवतींच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या संस्थांच्या सामाजिक योगदानाची दखल ब्रिटिश उच्चायुक्तालय घेत आहे. त्यात अॅड. रुद्राली पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट ब्रिटिश उच्चायुक्तालयाने प्रसारित केला. उदगीर परिसरात तसेच उत्तर प्रदेशमधील दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण व महिलांच्या हक्कांबाबत अॅड. रुद्राली पाटील व त्यांच्या चमूने जनजागरण केले.
आपल्या अनुभवासंदर्भात रुद्राली म्हणाल्या, अकरावी वर्गात असताना उत्तर प्रदेशमधील एका गावात प्रवाह संस्थेच्या माध्यमातून शिबिराला उपस्थित राहता आले. तिथे महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक इतकेच नव्हे, पडद्याबाहेर पडण्याची मुभा नसणे हे क्लेशदायी होते. स्वातंत्र्यानंतरचा प्रदीर्घ काळ उलटल्यानंतर शाळेत जातीभेद पाळला जात असल्याचे दिसले. त्याचवेळी आपण एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जनजागरण केले पाहिजे, असे ठरविले होते.
माझी आई डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे पाठबळ मिळाले. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर फाऊंडेशनच्या माध्यमातून युवा सहकाऱ्यांसोबत उत्तर प्रदेशात आणि महाराष्ट्रात उदगीर परिसर कार्यासाठी निवडला. ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे आरोग्य, मुलींचे शिक्षण यावर भर दिला. आज महिलांच्या बाजूने कायद्याचे पाठबळ आहे. परंतु त्याविषयी पुरेशी माहिती बहुतांश महिलांना नाही. मी स्वत: कायद्याचे शिक्षण घेतले असल्याने त्यात अधिक रस घेऊन प्रबोधनाचे काम केले. शाळाबाह्य मुलांना प्रवेश मिळवून देणे असेल वा मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी प्रयत्न, ही सर्व कामाची सुरुवात आहे, असेही अॅड. रुद्राली पाटील यांनी सांगितले. युवा पिढीच परिवर्तन करेल... आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची जिद्द युवा पिढीकडे असून, तीच परिवर्तन घडवेल असे सांगत फाऊंडेशनच्या प्रमुख रुद्राली पाटील चाकूरकर म्हणाल्या, गावपातळीवर समाज बदलाचे काम पुढे नेण्यासाठी ब्रिटिश उच्चायुक्तालयातून प्रोत्साहन मिळाले आहे. रुद्राली या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नात आहेत. दरम्यान, साई फाऊंडेशन व उदगीरच्या लाईफ केअरने अन्य एका संस्थेला सोबत घेऊन मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करण्याचे योजिले आहे.