तिरुअनंतपुरम : काँग्रेसमध्ये महिलांना उमेदवारीसाठी ‘संबंध’ ठेवावे लागतात असा आरोप केरळमधील या पक्षाचे ज्येष्ठ नेते फिलीप यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तिकीट नाकारण्यात आल्याबद्दल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून निषेध नोंदविल्याच्या पार्श्वभूमीवर फिलीप यांनी फेसबुकवर ही प्रतिक्रिया दिली.युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे नवे मॉडेल समोर आणले आहे. अशाच प्रकारचा शर्टलेस निषेध काही महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुपचूपपणे पार पाडल्यामुळे त्यांना तिकिटे मिळाली आहेत, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान केरळ काँग्रेसचे अध्यक्ष व्ही.एम. सुधीरन यांनी फिलीप यांना विधान मागे घेण्याचा तसेच माफी मागण्याचा आदेश दिला आहे. (वृत्तसंस्था)