'मला शिक्षा द्या, पण पोलिसांवर कारवाई करू नका'; प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 11:00 AM2021-10-21T11:00:23+5:302021-10-21T11:00:52+5:30
आग्र्याच्या पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या.
नवी दिल्ली:आग्रा येथे पोलिस कोठडीत अरुण वाल्मिकी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आग्र्याला जाणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला यूपी पोलिसांनी लखनऊ-आग्रा महामार्गावर रोखलं आणि ताब्यात घेतलं. पण, यावेळी काही महिला पोलिसांनी प्रियांका गांधींसोबत सेल्फी/फोटो काढले. आता या फोटोवरुनच प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.
प्रियंका गांधींचे महिला पोलिसांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियांका गांधी यांनी महिला पोलिसांसोबत सेल्फी क्लिक केल्यानंतर एक ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, "मी ऐकलंय की, योगी जी हे फोटो पाहून इतके अस्वस्थ झाले की त्यांना या महिला पोलिसांवर कारवाई करायची आहे. माझ्याबरोबर फोटो काढणे गुन्हा असेल तर मला त्याची शिक्षा झाली पाहिजे. या मेहनती आणि निष्ठावान पोलिसांची कारकीर्द खराब करणे सरकारला शोभत नाही.''
खबर आ रही है कि इस तस्वीर से योगी जी इतने व्यथित हो गए कि इन महिला पुलिसकर्मियों पर कार्यवाही करना चाहते हैं।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 20, 2021
अगर मेरे साथ तस्वीर लेना गुनाह है तो इसकी सजा भी मुझे मिले, इन कर्मठ और निष्ठावान पुलिसकर्मियों का कैरियर ख़राब करना सरकार को शोभा नहीं देता। pic.twitter.com/6wiGunRFEe
दोनदा प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं
पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना प्रियंका गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला आणि त्यांना ताब्यात घेतलं. पण, काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अखेर प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. विशेष म्हणजे, या महिन्यात पोलिसांनी दुसऱ्यांदा प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं आहे. याआधी लखीमपूर खेरीमध्ये पोलिसांनी पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाताना काँग्रेस सरचिटणीसांसह सर्व नेत्यांना ताब्यात घेतलं होतं.
नेमकं प्रकरण काय आहे ?
17 ऑक्टोबर रोजी आग्रा येथील जगदीशपुरा पोलीस ठाण्याच्या मालखान्यातून 25 लाख रुपये गायब झाल्याप्रकरणी पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्याला पकडलं होतं. पण, नंतर त्याचा मृत्यू झआला. नातेवाईकांनी पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात, एसएसपीने 5 पोलिसांना निलंबित केलं आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.