नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोनाच्या संकटात रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
रुग्णालयात आजारी पतीसाठी स्ट्रेचर न मिळाल्याने पत्नीवर आपल्या पतीला पाठीवर घेऊन डॉक्टरांकडे नेण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील एका रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोभा असं या महिलेचं नाव असून ती अमेठीची रहिवासी आहे. शोभाच्या पतीची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेणं गरजेचं होतं. शोभाने पतीला रुग्णालयात नेलं. मदतीसाठी तिने रुग्णालय प्रशासनाला विनंती केली मात्र तिला कोणीच मदतीचा हात दिला नाही.
रुग्णालय प्रशासनाने महिलेने केलेले आरोप फेटाळले
कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे स्ट्रेचर न मिळाल्याने आजारी पतीला पाठीवर घेऊनच ती रुग्णालयात काही वेळ फिरत होती. त्यानंतर डॉक्टरांकडे घेऊन गेल्याची माहिती तिने दिली आहे. रुग्णालय प्रशासनाला या घटनेबाबत विचारलं असता त्यांनी महिलेने केलेले आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. रुग्णालयात 6 ते 8 स्ट्रेचर आहेत आणि दररोज 500 हून अधिक रुग्ण येतात. कधीकधी स्ट्रेचर रिकामं नसतं, त्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागते. मात्र काही रुग्ण स्ट्रेचर मिळेपर्यंत थांबत नाहीत. महिलेनं रुग्णालयात मदत मागितली नव्हती. जर मदत मागितली असती तर मिळाली असती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चार वर्षांच्या चिमुकल्याला आपल्या आईसह रुग्णालयात ओढावा लागला होता स्ट्रेचर
काही महिन्यांपूर्वी एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर आपल्या आईसह रुग्णालयात स्ट्रेचर ओढण्याची वेळ आली होती. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील एका रुग्णालयात हा प्रकार घडला होता. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्णांना घेऊन गेल्यावर स्ट्रेचरवरून नेण्यासाठी पैसे मागितले जातात. मात्र ते न दिल्यामुळे एका महिलेला तिच्या लहान मुलासह स्ट्रेचर ओढावा लागला होता.