उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात राहणारी एक महिला सुमारे सहा वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर हतबल झाली होती. त्यानंतर कोरोनाचा देखील फटका बसला कोरोना साथीच्या काळात ती सॅनिटायझर विकून आपल्या मुलींचं पालनपोषण करत होती. मात्र आता तिच्या धाडसामुळे तिने कागदाच्या पिशव्यांचा उद्योग सुरू करून जवळपास 70 जणांना रोजगार दिला आहे. सर्वत्र हिचं कौतुक होत आहे.
कृष्णा नगर येथील रहिवासी रचना प्रशांत मोहन यांनी प्रधानमंत्री रोजगार योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेतून कागदी पिशवीचा उद्योग सुरू केला. त्यांनी शाहजहानपूरमध्ये स्थापन केलेलं पेपर बॅग उत्पादन युनिट 70 हून अधिक लोकांना रोजगार देत आहे. रचना यांनी 2017 मध्ये आजारपणामुळे पती प्रशांत मोहन यांना गमावले. दोन मुलांची आई असलेली रचना पतीच्या मृत्यूनंतर निराधार झाली होती. या दु:खात संधी साधून नातेवाईकांनी तिला घर खाली करायला सांगितलं.
"माझ्या सासरच्या लोकांची इच्छा होती की मी घर रिकामं करावं. त्यांनी केसेस दाखल केल्या मी नोकरीच्या शोधात घरोघरी फिरत राहिले, पण मला माझ्या मुलांना सांभाळायला आणि घर चालवायला मदत करणारे कोणतेही काम मला मिळाले नाही. जेव्हा कोविड-19 साथीच्या आजाराने थैमान घातले तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली. त्या कठीण काळात मी माझ्या वृद्ध आईच्या आधाराने काही दिवस घालवले."
"मी सॅनिटायझर विकायला सुरुवात केली, ज्यांना महामारीच्या काळात खूप मागणी होती आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने 25 लाख रुपयांचे कर्ज मिळेपर्यंत मी माझे काम चालू ठेवले. मी ती रक्कम कागदी पिशवी निर्मिती युनिट स्थापन करण्यासाठी वापरली. मी विक्रेत्यांना पिशव्या वाटायला सुरुवात केली. प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या लोकप्रिय करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मला मदत केली तेव्हा मला पाठिंबा मिळाला" असं रचना यांनी म्हटलं आहे
सध्या रचनाच्या कारखान्यात अनेक लोक काम करतात, तर महिला घरी देखील हे काम करण्यासाठी नेतात. यातून या महिला दिवसाला 400 रुपयांपर्यंत कमाई करतात. रचना म्हणाल्या, आम्ही सर्व आकाराच्या आणि दर्जाच्या कागदी पिशव्या तयार करतो, ज्या शाहजहांपूर आणि आसपासच्या सहा जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या भागात पुरवल्या जातात. सध्या माझ्यासोबत जवळपास 70 लोक काम करत आहेत, त्यात बहुतांश महिला आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.