"काँग्रेसचे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन", सोनिया गांधींची लोकसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 11:43 AM2023-09-20T11:43:51+5:302023-09-20T11:44:49+5:30
Women Reservation: मोदी सरकारने मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षण विदेयक मांडले, त्यावर आज सात तास चर्चा होणार आहे.
Women Reservation: आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत आहे. सर्वप्रथम कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. यानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.
#WATCH | Women's Reservation Bill | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi says, "...On behalf of Indian National Congress, I stand in support of Nari Shakti Vandan Adhiniyam 2023..." pic.twitter.com/BrzkEkba8G
— ANI (@ANI) September 20, 2023
राजीव गांधींनी पहिले विधेयक आणले
मेघवाल यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन कायदा) मांडले होते. यावर चर्चेसाठी आज सकाळी 11 ते सायंकाळी 6, अशी 7 तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी लोकसभेत बोलत आहेत. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, "काँग्रेसचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे. मी या विधेयकाच्या समर्थनार्थ उभी आहे. माझ्या आयुष्यातील ही एक मोठी गोष्ट आहे. महिलांचा सहभाग सुनिश्चित करणारे पहिले विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी आणले होते."
विधेयक तातडीने मंजूर करावे
त्या पुढे म्हणाल्या, "आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत. राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले, ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे पूर्ण होणार आहे. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, पण चिंताही आहे. महिला गेल्या 13 वर्षांपासून राजकीय नेतृत्वाची वाट पाहत आहेत. हे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी आहे."
#WATCH | Women's Reservation Bill | Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi says, "This is an emotional moment of my own life as well. For the first time, Constitutional amendment to decide women's representation in local body election was brought by my life partner… pic.twitter.com/stm2Sggnor
— ANI (@ANI) September 20, 2023
जातीय जनगणना करावी
"भारतीय महिलांमध्ये हिमालयासारखा संयम आहे. नव्या भारताच्या उभारणीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या. स्त्री कधीही संकटांच्या ओझ्याखाली दबली गेली नाही. कठीण काळात महिलांनी महात्मा गांधी, नेहरू आणि पटेल यांची स्वप्ने पुढे नेली. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व हे त्याचे उदाहरण आहे. यासोबतच जातींची जनगणना करून एससी/एसटी/ओबीसी आरक्षण द्यावे. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलली पाहिजेत," अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी यावेळी दिली.