बुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 09:05 PM2018-10-16T21:05:47+5:302018-10-16T21:07:49+5:30
केरळमधील सबरीमाला मंदिराचे दरवाजे मासिक पूजेसाठी बुधवारी उघडणार आहेत. मात्र त्यापूर्वी मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिरुवनंतपुरम - केरळमधीलसबरीमाला मंदिराचे दरवाजे मासिक पूजेसाठी बुधवारी उघडणार आहेत. मात्र त्यापूर्वी मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज प्रतिबंधित वयाच्या महिलांना मंदिराकडे घेऊन जाणाऱ्या वाहनांना भक्तांनी रोखले. भगवान अयप्पांच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना भेदभाव न करता प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर हे मंदिर बुधवारी प्रथमच उघडण्यात येणार आहे.
सबरीमाला मंदिरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या आधार शिवील निलाकल येथे पारंपरिक साडी परिधान केलेला महिलांचा समूह प्रत्येक वाहनाला अडवून तपासणी करत असल्याचे पाहण्यात आले. खासगी वाहनांबरोबरच राज्य परिवहनच्या बस रोखून विद्यार्थिनींना बाहेर उतरण्यास सांगण्यात आले. दरम्यान, हे प्रकार घडत असताना तेथे फार कमी पोलीस उपस्थित होते.
दरम्यान, सबरीमाला मंदिरातील प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही देण्यात येणार नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले.