नवी दिल्ली- समाजवादी पार्टीचे महासचिव रामशंकर विद्यार्थी यांनी महिलांच्या पोशाखावरून धक्कादायक विधान केलं आहे. महिलांच्या अश्लील कपडे वापरण्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं रामशंकर विद्यार्थी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नये, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं आहे. 'देवाने स्त्री व पुरूषाच्या शरीराची ज्या प्रमाणे रचना केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी कपडे वापरायला हवे. अंगप्रदर्शन होणार नाही, असे कपडे त्यांनी वापरावे, असं रामशंकर विद्यार्थी म्हणाले. रामशंकर विद्यार्थी यांचं विधान सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.
रामशंकर विद्यार्थी यांनी वाईट प्रवृत्तीच्या विचारांसाठी मोबाइल फोन आणि इंटरनेटलाही दोषी ठरवलं आहे. 'देशाच लैंगिक समस्यांच्या वाढत्या घटनांमागे मोबाइल फोन आणि इंटरनेट हे महत्त्वाचं कारण आहे. वाईट प्रवृत्तीच्या घटनांना मोबाइल जबाबदार आहे. अल्पवयिन मुलांकडे मोबाइल असणं वाईट नाही पण त्यांच्याकडे इंटरनेट असणं व त्यामुळे घडणाऱ्या अनेक गोष्टी वाईट विचारांना चालना देतात. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आधी अश्लीलता थांबवायला हवी. तरूणांमध्ये भावा-बहिणीचं नातं वाढवायला हवं', असे विचार रामशंकर विद्यार्थी यांनी मांडले आहेत.
दरम्यान, महिलांच्या पोशाखाबद्दल याआधीही समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. गेल्या वर्षी न्यू इअर पार्टीदरम्यान बंगळुरूमध्ये महिलांशी झालेल्या छेडछाडीच्या घटनेला सपा नेते अबू आझमी यांनी महिलांच्या पोशाखाला जबाबदार धरलं होतं.