ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28- केरळमधील एका ख्रिश्चन धर्मगुरूने महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओनंतर वादाला तोंड फुटलंय. ज्या महिला टी-शर्ट किंवा जीन्स घालतात त्यांना समुद्रात बुडवायला हवं असं वक्तव्य ख्रिश्चन धर्मगुरूने केलं आहे.
जॅसमिन पीके नावाच्या एका तरूणीने ख्रिश्चन धर्मगुरूचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. तोकडे कपडे महिला केवळ पुरूषांच्या भावना भडकावण्यासाठीच घालतात असंही ते म्हणाले आहेत. अशा प्रकारच्या महिलांच्या शरिराला दगडं बांधून त्यांना समुद्रात बुडवायला हवं असं ते म्हणाले.
केवळ पुरूषांच्या भावना भडकावण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठीच महिला अशे कपडे घालतात. त्यानंतर त्यांच्यासोबत काही वाईट झाल्यास त्या पुरूषांना दोषी धरतात मात्र, खरी चूक तर त्या मुलींचीच असते असं हे धर्मगुरू या व्हिडीओत बोलताना दिसतात.
हा व्हिडीओ शालोम टिव्हीवरून घेण्यात आला आहे, मात्र 12 महिन्यांपूर्वीच हा व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.