देशात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हैदराबादमधील बंदलागुडा रोडवर मंगळवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या आई आणि मुलीसह तीन महिलांचा मृत्यू झाला. तसेच चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात सनसिटी बंदलागुडा येथे झाला. घटनेनंतर कार चालक कार सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. तसेच तिन्ही मृतांचे मृतदेह उस्मानिया रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आले. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार प्रचंड वेगात होती. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.
साधारणपणे काहीशी अशीच घटना मंगळवारी महाराष्ट्रातही घडली. या घटनेत, कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन वाहनांना उडविल्यानंतर कंटेनर हॉटेल तोडून बाहेर पडला. या भीषण अपघातात किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर सकाळी साडेदहा वााजण्याच्या सुमारास घडला.