मांडला (मध्य प्रदेश) : बलात्कारांसारख्या हीन गुन्ह्यांविषयी सरकार संवेदनशील असून, अशा गुन्हेगारांना प्रसंगी फाशीही देण्याचा वटहुकूम सरकारने काढला आहे. पण कुटुंबांमध्येच महिलांना अधिक सन्मान दिला गेला आणि मुलांना अधिक जबाबदार बनविले गेले तर महिला अधिक सुरक्षित होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे सांगितले.अशा प्रकारच्या संस्कारांची सुरुवात प्रत्येक कुटुंबातून व्हावी व त्यातून एक जनआंदोलन उभे राहावे. तसे झाले तर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे कठीण नाही, असेही पंतप्रधानांनी सुचविले. मांडला या आदिवासीबहुल जिल्ह्यातील रामनगर येथे राष्ट्रीय पंचायत राज सम्मेलनात मोदीबोलत होते. सरकार आपले काम करतच असते. पण केवळ कडक कायदे केल्याने जेवढे फलित मिळणार नाही त्याहून अधिक यश सामाजिक पातळीवर जनआंदोलन उभे केल्याने मिळेल, असे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, कडक शिक्षेच्या तरतुदीने तुम्ही खुश झाल्याचे तुमच्या टाळ्यांतून व्यक्त झाले. लोकांची हीच भावना लक्षात घेऊन सरकारने कायदा अधिक कडक केला. पण महिला सुरक्षेसाठी कौटुंबिक सुसंस्कार आणि सामाजिक आदोलनही हवे, यावर त्यांनी भर दिला.
पहिला कायदा मध्य प्रदेशातमोदी यांच्या आधी बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद सर्वप्रथम मध्य प्रदेशने केली आणि आता केंद्रानेही देशासाठी तसाच कायदा केला, याचा उल्लेख केला.