लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : महिलांना भारतीय लष्करात प्रत्यक्ष आघाडी/सीमेवर लढण्याची संधी मिळणार आहे. जगात अगदी मोजक्या देशांमध्ये महिलांना अशी संधी असून भारतीय लष्कर तेथील भेदभाव संपवणार आहे. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत रविवारी येथे वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले की, ‘‘महिलांना लढणाऱ्या सैनिकाची भूमिका मिळण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. सध्या सीमेवर लढण्याची संधी फक्त पुरुषांनाच आहे. प्रारंभी लष्करातील पोलिसांच्या जागांवर महिलांची भरती केली जाईल.’’ महिलांकडे मी जवान म्हणून बघतो आहे. ती प्रक्रिया मी लवकरच सुरू करीत आहे. आधी लष्करातील पोलीस जवान म्हणून महिलांना संधी दिली जाईल, असे ते म्हणाले. या संदर्भातील तपशीलही रावत यांनी दिला. सध्या लष्करात महिलांना वैद्यकीय, कायदा, शिक्षण, सिग्नल्स आणि अभियांत्रिकी शाखा अशा मोजक्या ठिकाणीच संधी मिळते परंतु प्रत्यक्ष लढाईच्या भूमिकेपासून त्यांना दूर ठेवले गेले आहे. महिलांना जवान म्हणून भरती करण्यास माझी तयारी असून हा प्रश्न सरकारकडे उपस्थित करण्यात आला आहे, असे बिपिन रावत म्हणाले. आम्ही आधीच ही प्रक्रिया सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष लढाईच्या भूमिकेचे आव्हान स्वीकारताना महिलांना धैर्य आणि शक्ती सिद्ध करावी लागेल, असे रावत म्हणाले. जर्मनी, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, नॉर्वे, फ्रान्स, स्वीडन, फिनलंड आणि इस्रायल या देशांनीच महिलांना प्रत्यक्ष लढण्याची संधी दिली आहे.> हवाई दलात महिलांच्या हाती लढाऊ विमाने भारतीय हवाई दलाने गेल्या वर्षी तीन महिलांना लढाऊ विमानचालक म्हणून सामावून घेतले आहे. लढाऊ विमानचालक म्हणून महिलांना प्रायोगिक पातळीवर संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर वर्षभरापेक्षा कमी कालावधीत ही संधी तिघींना मिळाली. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांना संधी दिली जाईल. भारतीय नौदलात महिलांना कायदा, अभियांत्रिकी, नौदल आर्किटेक्चर अशा विभागांत संधी मिळते. त्यांना जहाजावर कामाची संधी देण्याचा विचार तेथेही सुरू आहे.
महिलाही लढणार प्रत्यक्ष सीमेवर !
By admin | Published: June 05, 2017 6:06 AM