ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - एशियानेट या मल्याळम वाहिनीची महिला पत्रकार आणि अँकर सिंधू सुर्याकुमार सतत मोबाईलवरुन सुरु असलेल्या अपमानामळे त्रस्त झाली आहे. सिंधूने २६ फेब्रुवारीला न्यूज हवर कार्यक्रमात महिषासूर जयंती साजरी करणे देशद्रोह आहे का ? या विषयावर डिबेट शो केला.
तेव्हापासून सिंधूचा मोबाईल फोन सतत खणखणत असून, फोन करणारे सिंधूला अपमानास्पद चार शब्द सुनावत आहेत. या कार्यक्रमानंतर सिंधूला दोन हजारपेक्षा जास्त फोन कॉल्स आले आहेत. या डिबेट शो मध्ये बोलताना सिंधूने देवी दुर्गामातेचा अपमान केल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमानंतर सिंधूबद्दल फेसबुकवरुन अनेक अपमानास्पद पोस्ट करण्यात आल्या. त्यातील एका पोस्टमध्ये सिंधूचा मोबाईल नंबर होता. या पोस्टमध्ये सिंधूला फोन करुन अपमान करावा अशी विनंती करण्यात आली होती.
या कार्यक्रमात सीपीएमचे खासदार एमबी राजेश, भाजपचे राज्य सरचिटणीस व्ही.व्ही.राजेश आणि काँग्रेसचे खासदार अँटो अँटोनी सहभागी झाले होते. सतत खणखणा-या फोनला कंटाळून अखेर सिंधूने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काही जणांनी फक्त अपशब्द न वापरता तिला धमकावलेही होते. केरळ पोलिसांनी या प्रकरणी पाचजणांना अटक केली आहे.