नवी दिल्ली - साऊथचा अभिनेता सिद्धार्थ आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत केलेल्या एका ट्वीटवरून तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, त्यावर आता राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीस पाठवली. तसंच सिद्धार्थवर एफआयआर दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यानंतर, आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी तामिळनाडूच्या डिजीपींना सिद्धार्थवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेता सिद्धार्थने वारंवार महिलांबद्दल लैंगिक टिप्पणी दिली आहे. त्यामुळे, आता सायना नेहवालच्या मुद्द्यावर कारवाई करण्यासाठी एनसीडब्ल्यू तामिळनाडूच्या डीजीपीच्या संपर्कात आहे, असे रेखा शर्मा यांनी सांगितलंय. तसेच, सिद्धार्थची पोस्ट ही महिलांच्या आत्मसन्मानला ठेस पोहोचवणारी आहे. म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाने तामिळनाडूच्या डीजीपींना पत्र लिहून यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आयोगाने सुमोटो एक्शन घेतली आहे.
काय म्हणाला होता सिद्धार्थसायना नेहवालच्या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थनं ट्वीट केलं होतं. तसंच यामध्ये त्यानं द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे शेम ऑन यू रिहाना असं लिहिलं होतं.
महिला आयोगाची कारवाई
या प्रकरणानंतर महिला आयोगाकडून सिद्धार्थला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसंच आयटी अॅक्ट अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासही सांगण्यात आलं आहे. महिला आयोगानं ट्विटरला हे ट्वीट हटवण्यासंदर्भातही कारवाई करण्यास सांगितलं आहे. याशिवाय महिला आयोगानं मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून यासंदर्भात अहवाल मागवला आहे. आयोग याप्रकरणी कारवाई करत असल्याची माहिती महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरद्वारे दिली. सिद्धार्थनं यापूर्वी रंग दे बसंती या चित्रपटातही भूमीका साकारली होती. यापूर्वी त्याच्या वक्तव्य, ट्वीटवरून वाद निर्माण झाला होता.