ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो.
28 फेब्रुवारी 1909 - पहिला महिला दिवस
अमेरिकेमध्ये 28 फेब्रुवारी 1909 साली सर्वात आधी महिला दिवस साजरा करण्यात आला. यानंतर ऑगस्ट 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन करण्यात आले होते. याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरवण्यात आले. पण यावेळी तो दिवस निश्चित करण्यात आला नव्हता. या घडामोडींनंतर 8 मार्च 1914 रोजी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिवसापासून 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो.
मतदानाचा अधिकार
खरंतर महिला दिनाची सुरुवात महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी करण्यात आली. कारण बहुतेक देशांमध्ये महिला मतदानाच्या अधिकारापासून वंचित होत्या.
महिलांना प्रत्येक मुलभूत हक्क प्राप्त
भारतात महिलांना शिक्षण, मतदान यांसारखे अनेक मुलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. महिला आपल्या पतीच्या संपत्तीतही समान हक्काचा अधिकार आहे.
दरम्यान, जगभरातील निरनिराळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जातो. या महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील नांदगाव येथे राहणा-या सुशीला खुरकुटे यांचा 8 मार्च रोजी म्हणजे महिला दिनी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मान करणार आहेत. गाव हागणदारीमुक्त करण्याच्या योजनेत विशेष योगदान दिल्याबद्दल या आदिवासी महिलेचा शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.