Women's Day 2021: अमेरिकेतील नोकरी सोडून झाली गावची सरपंच, काही वर्षातच केला कायापालट....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:49 AM2021-03-08T09:49:30+5:302021-03-08T10:02:26+5:30
Women's Day 2021: आपल्या कारनाम्यांमुळे भक्ती शर्मा यांचा भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत सामिल केलं आहे. भोपाळच्या नूतन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलेल्या भक्ती कायद्याचं शिक्षण घेत आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्ताने (Women's Day Special) आज आम्ही तुम्हाला एका अशा सरपंच महिलेची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी गावाचा विकास करण्यासाठी अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडली. त्या मध्य प्रदेशची(Madhya Padesh) राजधानी भोपाळपासून(Bhopal) २० किलोमीटर अंतरावरील बरखेडी अब्दुल्ला गावच्या सरपंच भक्ती शर्मा (Bhakti Sharma). एकेकाळी ज्या गावात कच्ची घरे, विजेचा तुटवडा आणि अशुद्ध पाणी यांसारख्या समस्या होत्या आज त्याच गावात ८० ट्क्क्यांपेक्षा घरे पक्की करण्यात आली आहेत. आता इथे पाणीही शुद्ध येतं. सोबतच वीज आणि शौचालयाची व्यवस्थाही झाली आहे. चला जाणून घेऊ हा बदल घडवून आणणाऱ्या महिला सरपंच भक्ती शर्मा यांची कहाणी...
गावासाठी अमेरिकेतील नोकरी सोडली
आपल्या कारनाम्यांमुळे भक्ती शर्मा यांचा भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत सामिल केलं आहे. भोपाळच्या नूतन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलेल्या भक्ती कायद्याचं शिक्षण घेत आहेत. त्यांनी सिविल सेवेची तयारी केली, पण अनेकदा अपयशच मिळालं. अशात त्यांनी परदेशात जाण्याचा विचार केला. त्या अमेरिकेत गेल्या, नोकरी केली. मात्र त्यांना गावासाठी जबाबदारी पूर्ण करण्याची जाणीव झाली. त्या परत आल्या आणि आपलं गाव बरखेडी अब्दुल्ला येथे जाऊ लागल्या.
(Image Credit : umasreeraghunath.blogspot.com)
गावकऱ्यांनीच बनवलं सरपंच
भोपाळ जिल्ह्यात येणारं बरखेडी गाव मुख्य शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. एकेकाळी मागास श्रेणीत येणाऱ्या गावामध्ये २०१५-१६ मध्ये निवडणूक होणार होती. तेव्हाच वडिलांनी आणि गावकऱ्यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर भक्ती यांनी सरपंच पदासाठी नामांकन दाखल केलंय. त्या मोठ्या मतांनी जिंकून आल्या. त्या सरपंच झाल्या आणि त्यांनी गावाचं चित्रच बदलून टाकलं.
मुलीचा जन्म झाल्यास देतात दोन महिन्यांचा पगार
भक्ती या गावातील महिला आणि मुलींच्या विकासासाठी मोहिमही चालवत आहेत. यानुसार गावातील कोणत्याही घरात मुलीचा जन्म झाला तर मुलीच्या आईला त्या त्यांचा दोन महिन्यांचा पगार गिफ्ट म्हणून देतात. सोबतच मुलगी झाल्याच्या आनंदात गावात १० झाडे लावतात. आतापर्यंत गावात साधारण ६,५०० पेक्षा झाडे लावली असून त्याची ७५ टक्के झाडे मोठी झाली आहेत.
गावात रस्ता, पाणी आणि वीज
सरपंच पद मिळताच त्यांनी तत्परतेने कामाला सुरूवात केली आणि गावाला शहराशी जोडण्यासाठी रस्ता बनवला. गावातील ८० टक्के कच्ची घरे पक्की केली. गावातील वीज आणि पाण्याची समस्या दूर केली. गावातील सर्वच लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला. तसेच लोकाना आर्थिक रूपाने सशक्त आणि मजबूत केलं.
गावातील लोकांना शिक्षण
बरखेडी अब्दुल्ला गावात एकेकाळी फार कमी शिक्षित लोक होते. पण भक्ती यांनी गावातील लोकांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं. गावातील सर्व रस्ते शाळेशी जोडले. मुलांना शाळेत येण्यासाठी सायकली दिल्या. गावातील कुपोषण दूर करण्यासाठी मुलांना मिड डे मीलही दिलं जातं. याचा प्रभाव काही वर्षातच बघायला मिळाला आणि कुपोषणाच्या आकडेवारीत घट झाली.