ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - भारतीय वायू दलाने भारताच्या पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांना पुढची चारवर्ष मातृत्वाची संधी घेऊ नका असा सल्ला दिला आहे. हा सल्ला कायदेशीररित्या बंधनकारक नसल्याचे वायू दलातील सूत्रांनी सांगितले.
महिला वैमानिकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेवर प्रतिकुल परिणाम होऊ नये यासाठी हा सल्ला देण्यात आला आहे. प्राथमिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर यावर्षी १८ जूनला या तीन महिला वैमानिक फाईटर वैमानिकांच्या चमूमध्ये सहभागी होतील.
त्यानंतर या महिला वैमानिकांना वर्षभर अॅडव्हान्स प्रशिक्षण दिले जाईल त्यानंतर जून २०१७ मध्ये त्या फाईटर विमानाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करतील. लढाऊ वैमानिकांना कमीत कमी पाचवर्ष सलग प्रशिक्षण लागते. गर्भारपणामुळे प्रशिक्षणाच्या वेळापत्रकामध्ये व्यत्यय येतो. त्यामुळे या महिला वैमानिकांना मातृत्वाची संधी न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.