लखनऊ : केंद्र सरकारने आता देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले असून या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर निशाणा साधला.
एनपीआरचा फॉर्म भरणार नाही. आपण भारतीय नागरिक आहोत की नाही, हे भाजपा ठरवू शकत नाही. आम्हाला रोजगार पाहिजे, एनपीआर नको. देशाची अर्थव्यवस्था अतिदक्षता विभागात गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, असे सांगत अखिलेश यादव यांनी भाजपावर हल्लाबोल केला. याशिवाय, आम्ही एनआरसी आणि एनपीआर फॉर्म भरणार नाही, तर महात्मा गांधींनी आपल्या पहिल्या आंदोलनात कागदपत्रे जाळली होती. आपणही तसेच करायचे, असे आवाहन अखिलेश यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले.
याचबरोबर, भाजपा सरकार जनतेला घाबरत आहे. त्यामुळे भाजपा सत्य काय आहे, ते जनतेपर्यंत पोहचू देत नाही. देशात अन्याय खूप वाढला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा दिला जात नाही. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान अनेक निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना समाजवादी पार्टीकडून मदत करण्यात येईल, असेही यावेळी अखिलेश यादव यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.