भोपाळ : मध्यप्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होेते. यात हजार जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी राज्यमंत्री गोपाळ भार्गव उपस्थित होते. त्यांनी सर्व नववधूंना सप्रेम भेट म्हणून लाकडी बॅट दिली. मंत्री महोदयांच्या या अजब भेटीमुळे उपस्थित हैराण झाले. मात्र, भार्गव यांनी यामागील आपला तर्क सांगितला. तेव्हा खसखस पिकली. भार्गव म्हणाले की, दुर्गम भागात घरगुती हिंसाचाराची समस्या तीव्र आहे. पती दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असेल, तर त्याला सुधारण्यासाठी या बॅट कामी येतील. भार्गव यांनी महिला सबलीकरणाला चालना देण्यासाठी या आगळ्यावेगळ्या भेटीची निवड केली. ज्या घरात शिक्षणाची वानवा आहे तेथे महिलांवर अनन्वित अत्याचार होतात. महिला त्यांच्यावरील अत्याचार चौकटीच्या आत ठेवतात. त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची भीती वाटते. घरात ही बॅट असेल, तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. जर पती मारहाण करीत असेल, तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्या. लाकडी बॅट नववधूंसाठी एक उपयुक्त हत्यार ठरेल. आपल्या सुरक्षेसाठी महिलांना बॅट हाती घ्यावीच लागणार आहे. महिला अत्याचार सहन करीत राहिल्या, तर पुरुषांची हिंमत आणखी वाढेल, असेही भार्गव म्हणाले.
नववधूंना भेट म्हणून दिली लाकडी बॅट
By admin | Published: May 15, 2017 12:08 AM