ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - व्हॉट्सअॅपवर अनेकदा एखादा मेसेज चुकून पाठवला जायचा. मात्र तो डिलीट किंवा एडिट करण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची माफी मागणे एवढा एकच काय तो पर्याय बाकी होता. पण आता व्हॉट्सअपने नवं फिचर आणलं असून यामध्ये मेसेज पाठवल्यानंतर एडिट अथवा डिलीटही करता येणार आहे. या फिचरसाठी व्हॉट्सअॅप गेल्या अनेक महिन्यापासून रिव्होक (Revoke) या फीचरवर काम करत आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपने वेब व्हर्जनवर सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.
व्हॉट्सअॅपसंबंधी माहिती लीक करणारं ट्विटर हॅण्डल @WABetaInfoने यासंबंधी ट्विट करुन माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये रिव्होक फिचर दिसत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण यामधील मुख्य गोष्ट म्हणजे मेसेज पाठवल्यानंतर तो अनसेंड म्हणजेच एडिट किंवा डिलीट करण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच मिनिटांचा अवधी असणार आहे.
याशिवाय @WABetaInfoनं आणखी एक स्क्रिन शॉट लिक केलं आहे. ज्यामध्ये अँड्रॉईड बीटा यूजर्स व्हर्जन 2.17.148 वर फॉन्ट शॉटकट असणार असल्याचं म्हटलं आहे.
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्साठी दरवेळी काहीतरी नवीन देण्याच्या हेतून फिचर्स आणण्याचा प्रयत्न करत असतात. याआधी त्यांनी आपल्या स्टेटस फिचरमध्ये बदल करत युजर्सना स्टेटसमध्ये फक्त टेक्स्ट न टाकता फोटो, व्हिडीओ आणि GIF टाकण्याची सोय दिली होती. व्हॉट्सअॅपने आपल्या आठव्या वाढदिवशी हे फिचर सुरु केलं होतं. पण युजर्सना हा बदल अजिबात आवडला नाही. मुळात नवं फिचर आलं आहे, यापेक्षा जुना टेक्स्टचा पर्याय गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोबतच ठेवलेला फोटो किंवा स्टेटसचा सर्वांना अलर्ट जातो हेदेखील अनेकांना आवडलेलं नव्हतं. आपला हा प्रयोग फसल्याचं पाहून व्हॉट्सअॅपनेही आपलं जुनं फिचर पुन्हा रिलाँच केलं होतं.