नवी दिल्ली, दि. 10 - स्पर्धात्मक परीक्षांमध्ये स्थानिक भाषांच्या मुद्यावरून एका प्रकरणाची सुनावणी सुरू असून न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी एक अत्यंत वेगळे परंतु महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. मराठी किंवा गुजराती अथवा बंगालीसारख्या कुठल्याही प्रादेशिक भाषांना व्हर्नाक्युलर म्हणायची पद्धत आहे. तिचाच आधार घेत ज्येष्ठ वकिल इंदिरा जयसिंग व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मणिंदर सिंग यांनी नीटची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये असावी काय बद्दल चर्चा करताना व्हर्नाक्युलर हा शब्दप्रयोग केला.यावेळी न्यायाधीश मिश्रा, जे भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जातात, त्यांनी या वकिलांची चूक लक्षात आणून दिली. मिश्रा म्हणाले, 'तुम्ही दोघेही व्हर्नाक्युलर हा शब्द वापरताय, जो हीनता दर्शक आहे.' फली नरीमन आणि शेखर नाफडे हे ज्येष्ठ वकिल कोर्टात उपस्थित होते. त्यांनी मिश्रांच्या म्हणण्याला दुजोरा देताना हा इंग्रजांच्या वसाहतवादाच्या काळातील शब्द असल्याचे सांगितले. इंग्रजांनी पारतंत्र्यात असलेल्या भारतीयांच्या भाषांना दुय्यम दर्शवण्यासाठी व्हर्नाक्युलर लँग्वेजेस असा उल्लेख केला, असेही त्यांनी स्पष्ट केले. सामान्य किंवा कमी प्रतीच्या लोकांची भाषा असा अर्थ व्हर्नाक्युलर म्हणताना इंग्रजांना अभिप्रेत असल्याचे न्यायाधीश व ज्येष्ठ वकिलांनी सांगितले. त्यानंतर जयसिंग व सिंग या दोन्ही वकिलांनी आपल्या भाषेत सुधारणा करत व्हर्नाक्युलर न म्हणता रिजनल लँग्वेज हा शब्द वापरायला सुरूवात केली.भारताच्या विविध भाषांमध्ये नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या सीबीएसईवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. सगळ्या परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असायला हवी असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
Vernacular असं म्हणून भारतीय भाषांना तुच्छ लेखू नका, Regional म्हणा - न्यायाधीश मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:26 PM
स्पर्धात्मक परीक्षांमध्ये स्थानिक भाषांच्या मुद्यावरून एका प्रकरणाची सुनावणी सुरू असून न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी एक अत्यंत वेगळे परंतु महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे
ठळक मुद्देतुम्ही दोघेही व्हर्नाक्युलर हा शब्द वापरताय, जो हीनता दर्शक आहे.हा इंग्रजांच्या वसाहतवादाच्या काळातील शब्द असल्याचे सांगितलेभाषेत सुधारणा करत व्हर्नाक्युलर न म्हणता रिजनल लँग्वेज हा शब्द वापरा